Wednesday, January 16, 2013


आई

आई...मनाच्या भिंतीवर रंगासारखी, रोजच्या आयुष्याच्या सिनेमात पार्श्वसंगीतासारखी...तिथेच रेंगाळणारी, सवयीची झालेली...पण सगळ्यालाच अर्थ देणारी. मुलाचा पुरुष होतो तशी दबक्या पावलांनी आई त्याच्या भावविश्वातून माघार घेते.पण ती पाउलं नेहमी नजरेच्या विरुद्ध दिशेला असतात. ती नजर माझा पाठलाग करतच राहते. एखाद्या चेटुकासारखी मला घाबरवून सोडते. देवाच्या साध्या मूर्तीसमोर नतमस्तक व्हायला लावते. भरकटत चाललेल्या विचारांना उदबत्तीच्या धुराने सावरते. मांस खाऊन आल्यावर आंघोळ करायला लावते. लोभ, वासना, मत्सर सगळं सहानुभूती ने पाहते. पोह्यान्मधले कांदे बाजूला काढल्यावर मिश्कील होते, कीव ही करते. रात्री घरी आल्यावर मात्र ती ही बहुतेक घरी जाते, निजते. मग स्वप्नात काळ्याकुट्ट काजळात गुरफटून, लाल भडक माथ्याखाली उग्र होत जाते. झोपेतही जणू जागं ठेवते. घर्मस्नान घालून उठवते. उठल्यावर मात्र घरभर साचून राहिलेले दोन-तीन अश्रू असतात. माझ्या एकटेपणाला वाहिलेल. भौगोलिक अंतराच्या भावनिक कोंडीत सापडलेले.

स्वत्व ही कल्पना स्त्रीच्या मनात आली तेव्हा ती बहुतेक गरोदर असावी. स्व ची जाणीव दुसऱ्याच्या असण्याने होणे हा मनुष्यस्वभावच. पुरुषाला ती पत्नीच्या असण्याने होणं तसंच  काहीसं. पण निर्मितीच्या क्षमतेतून होणारी जाणीव काही औरच असावी. पुन्हा कलाकाराची आणि स्त्रिची निर्मिती यातही तफावत. अगदीच ललित लिहायला बसलोय म्हणून स्त्रिच्या या निर्मितीला कलाविष्कार वगैरे उपमा नको. ही निर्मिती निसर्गाच्या कितीतरी जवळ जाणारी, कितीतरी उदात्त आणि कितीतरी वेदनादायक! असा हा आपल्यातूनच निर्माण होणारा जीव आपल्यासारखा नसेल तर तिला किती यातना होत असतील! त्याचं नाक, त्याचे डोळे, त्याची हनुवटी केवळ संभोगासाठी जवळ आलेल्या पुरुषासारखे असतील तर तिला काय वाटत असेल? तो योनी ऐवजी लिंग घेऊन जन्मला असेल तर त्या बाळकृष्णाचा दाढी-मिशा असलेला, संभोगी नजरेचा पुरुष होत जाताना तिला काय आठवत असेल? डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत कवीच्या भाबड्या नजरेने पहिला तर माकडीणीच्या पोटी माणूस जन्मला त्यावेळी तिला काय वाटलं असेल? जो जन्म माणूस दुसऱ्याला आपल्यासारखं बनविण्यात घालवतो, तो जन्म ती आपल्यासारख्या, आपल्यातुनच जन्मलेल्याला काहीतरी वेगळंच बनताना पाहत घालवते. आणि मग उरतो त्याच्यासारखं बनण्याचा केविलवाणा प्रयत्न. पिढीचा अंतर विसरून, किंवा त्या अंतराची जाणीवच न होऊन.

'एक होता विदुषक' मधील आबुरावची आई मला आठवते. आबुला 'नटव्या' नटीकडे आकर्षित होताना, त्याचं पूर्ण विश्व बदलताना पाहून तिचा होणारा तळतळाट आबू ईतकाच माझ्या मनालाही चटका लावतो. त्याच्या मनात त्याची आई तिच्या खऱ्या मृत्यू आधीच मरते. नटव्या नटीशी पटेनासं झाल्यावर पिशाच्चासारखी मनाच्या कोपऱ्यातून बाहेर येऊन त्याला पछाडते. असं आईचं मनातून मरणं फार वाईट. घराच्या कोपऱ्यात का होईना आई असावी. तिचे देव, जपाच्या माळा नजरेतखुपत राहाव्यात. तिचा चष्मा बनवून आणण्याचं काम जीवावर यावं. तिच्या क्षीण होत चाललेल्या श्रवणशक्तीमुळे वैताग यावा. 'लग्न कर', 'जेजुरीला जाऊन ये','त्र्यंबकेश्वर ला घेऊन चल, तुझ्या हातून पूजा घालायची आहे' - तिची भुणभुण सुरूच राहावी. आपले हट्ट या विरोधाने आणखीनच प्रबळ होत जावेत. मग कुठल्यातरी हळव्या क्षणी तिने emotional blackmail करून सारंच करून घ्यावं. खंडोबा, त्र्यंबकेश्वर, लग्न...पुन्हा एक स्त्री, पुन्हा माता आणि तेच चक्र. नव्या पिढीच्या नव्यासंदर्भांसह, गाभा मात्र तोच.

आजकाल ती t.v. वरच्या मालिका बघते. खूप वर्षांपूर्वी तिने t.v. वर फक्त 'माहेरची साडी' पाहण्यासाठी हक्क गाजविल्याचं मला आठवतं. बाकी तिचं t.v. बाबत म्हणणं 'दहा वाजता बंद करा' इतकंच असे. ते पाळावं ही लागे. आता त्या उपकरणात तिच्यातलं रिकामपण साचून राहिलंय. कुठलंतरी पात्र कदाचित तिला स्वतःची आठवणही करून देत असेल. 'Reality Shows' पाहताना ती गुणगुणत असेल, खुर्चिवर ठेका तरी धरत असेल. २८ इंचाच्या त्या डब्यात आयुष्य संकुचित होणं मी सुद्धा अनुभवलंय. पण ते माझा बालपण होतं, त्याला कल्पनांची, आशा-आकांशांची जोड होती. तिलाही आता तेच वाटत असेल का? 'फू बाई फू' किंवा तत्सम विनोदी म्हणवणाऱ्या कार्यक्रमांना पाहताना ती तशीच डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसतअसेल का? ते हसणं साधं आठवूनही मला हसायला येतं. तिचं काटेकोर time-table ती आजही तसंच पाळत असेल का?की मंदिरात संध्याकाळी जाणं हा केवळ अन्न पचविण्याचा व्यायाम उरलाय? तिच्यात अजूनही सोनं-नाणं जमवणारी,ढीगभर साड्या संचयी ठेवणारी हौशी स्त्री आहे. ती हौस कधी मला ही भागवता यावी. मागच्या वर्षी mall मध्ये पाहिलेली तीdesigner साडी मी अजूनही तिला मनातल्या मनातच देतोय.

ती नजर आता मला थांबायला सांगतेय. पण मी माझ्याच डोळ्यांसमोर हात धरलाय. उदबत्तीचा सुवास मात्र भरकटलेल्या विचारांना आवर घालण्यास बांधील आहे. तिला असं कधीच दिशाहीन नाही होता आलं. माझं मन मात्र स्वैर धावतंय. तिचे स्तन मला दिसताहेत. जाणीवा ताठर न होतां अमृताचा तो उगम पाहणे किती अद्भुत, किती शुद्ध! तिच्या आणि माझ्या नात्याचा भौतिक पाया. बेम्बीची नाळ कापल्यावरही तिला आणि मला संलग्न ठेवणारा धागा. मी आकुंचन पावत पुन्हा तिच्या मांडीत जाण्याएवढा होतो. वाढलेली दाढी मात्र दगा देते. ती डोळे मोठे करून पाहते. मी भस्म व्हायच्या आधीच त्या डोळ्यांवाटे तिच्या पोटात जातो. पाय मुडपून डोळे बंद करतो. ती नजर ही शांत झोपते. बेम्बिला ती नाळ पुन्हा जुळायला लागते...

4 comments:

  1. अभिनंदन.
    थोडक्यात, “आई असते जन्माची शिदोरी.. सरतही नाही आणि उरतही नाही!”
    (सौजन्य-फ. मुं. शिंदें)

    ReplyDelete