Monday, July 7, 2014

मॉर्निंग वॉक: गंभीर तथा अर्थहीन

नवले उड्डाण पुलापासून नऱ्हे गावाकडे जायला निघालं की पुणे-बंगलोर हायवेच्या दोन्ही बाजू अनेक किलो कचऱ्याने सुशोभित आहेत. हा माझा मॉर्निंग वॉकचा रस्ता. सडत चाललेल्या आणि या प्रक्रियेच्या वेगवेळ्या stage ला असलेल्या प्रत्येक ingredientचे तपशील येथे देत नाही, पण या ढीगातून एक वैशिट्यपूर्ण दर्प येत असतो. म्हणजे तुम्ही सकाळी ताजेतवाने व्हायला निघालात आणि रस्त्यात मळमळ, शिंका सुरु झाल्या, असं होण्याची पूर्ण शक्यता असते.

तुम्ही कुठल्या विचारासकट उठला आहात, यावर तुम्हाला हा दर्प किती जाणवतो, ते ठरते. ‘लोकप्रियता: प्राप्ती आणि टिकाव’ अशा काहीशा गंभीर तथा अर्थहीन विचार माझ्या डोक्यात उठल्या उठल्या आला होता. दोन आठवड्यांपासून ठसठसणारं डोकं त्यात भरीस भर. शरीर आणि मनाच्या उसवलेल्या घड्यांचं cause and effect नातं, माझं बऱ्याचदा हरवलेलं असतं.

मग लोकप्रियतेचे घटक कोणते यावर चर्वण करत करत मी रस्ता कापत होतो, दर्प तीव्र होत होता. facebook वर आजकाल भरवशाच्या वाचकांनाही मी काय लिहतोय हे कळेना, म्हणजे गंभीर (तथा अर्थहीन नव्हे) बाब होती. म्हणजे पहिला घटक झाला simplification – विचार साधा सोपा सरळ करून मांडणे. यानंतर humour – विनोदी असलं की खात्रीचे लाईक्स मिळतात. थोडंसं romanticism, चवीपुरतं realism – जमेल भट्टी.

सगळ्याच्या मूळाशी असलेला शेवटचा घटक मात्र जरा जाचक – आपलं सोडून दुसऱ्याला आवडेल असं लिहणं. सगळीच गाडी रुळावरून घसरली. दुःख, वेदना...कारण नसलेली, उगाच वातावरणात भरून राहिलेली, याला शब्द द्यायचे म्हणजे रिस्क! त्याला वर लिहिलेल्या ingredientsची साथ हवीच. Fandryच्या कथेला लोकप्रिय व्हायला जसं ‘पिरतीचा विंचू’ गाणं लागलं, तसं. पुन्हा त्यातही poetic, जड वगैरे होण्यात अर्थ नाही. छोटी, सुबक वाक्यं...शक्य तिथे यमक जुळलेलं.

या प्रवाहाविरुद्ध शेक्सपिअर, चार्ल्स डिकन्स यांचे दृष्टांत स्वतःला देत मी नऱ्हे गाव ओलांडून CCD कडे जाणारा चढ चढलो. हा एकूणच वॉकचा बेस्ट पार्ट. इथेही डाव्या बाजूला कचरा आहेच पण उजव्या बाजुला कट्टे आहेत, जिथून खाली भरधाव वाहणारा हायवे आणि समोर टेकडी दिसते. सूर्यास्त पाहण्यासाठी हा नऱ्हे गावतला ‘स्पॉट’. इथे बऱ्याचदा पराभूत आशिक उदास बसलेले असतात. आज एक दहा-बारा वर्षांचा मुलगा एकटाच समोर एकटक बघत बसला होता. त्याची गिअरची सायकल बाजुला लावलेली होती. बारीक केस कापलेला, लांब बाह्यांचा पांढरा टी-शर्ट घातलेला. पण उदास.

वाटलं बोलावं ह्याच्याशी दोन मिनिट. पण थोडासा पुढे जाऊन कट्ट्याशी थांबलो. मला वाटलं तो conscious होईल. पण त्याची देहबोलीत काहीच फरक नाही पडला. तो तसाच त्याचा जो काही विचार होता, त्यात पार बुडून समोर पाहत राहिला. ती वेदना होती हा माझा निष्कर्ष, माझ्या दृष्टीने काढलेला. पण आईने ट्रीपला जाऊ दिले नाही असं काहीसं साधं कारण ही असेल, त्याच्या दृष्टीने मोठं असलेलं. पण तो कुठलंच बंधन न बाळगता त्या भावनेला मिठी मारत होता. सच्च्या, निर्भीड तळमळीने.


CCDच्या अलीकडच्या पुलावरून मी परत यायला वळालो. मला शब्द सापडत होते. दुसऱ्या बाजुलाही तेवढाच कचरा आहे. त्याचा दर्प मात्र आता जरा कमी जाणवत होता.

No comments:

Post a Comment