Tuesday, October 28, 2014

वेदना


दुःखाला काही कारण असणाऱ्यांची त्याला कीव यायची. अशी स्वार्थी कशी असू शकते कोणाची भावना दुःखाबद्दल! जर ते कारण नाहीसं झालं, तर मग त्या दुःखाचं काय? त्याला, त्याच्या उदात्त रुपाला असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं?

मनात संवेदनांचा उगम झाला तेव्हापासून तो वेदनेची अनेक रूपं शोधत होता, तिला अनेक रूपं देत होता. कधी मनातून शरीराकडे गेलेल्या आजारात, कधी वैश्विक समस्यांतून आलेल्या फुटकळ हतबलतेत, कधी काल्पनिक प्रेमातून झालेल्या काल्पनिक प्रेमभंगात...त्याला जिथे तिथे ती दिसत असे. कागदावर उतरताना कधीतरी यमकही जुळत असे; पण मग त्याला वाटे यमकातून आनंद निर्माण होतोय. पण एकूण लिखाणाच्या प्रक्रियेतूनच तो निर्माण होतोय, हे जाणवल्यावर तो हादरला. ही पुन्हा दुःखाशीच बेईमानी! कागद-पेनही हातचं सुटलं. सिगारेट सुटली होती तशी.

त्यानंतर एकदा डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा आणि चेहराभर दाढीसारखी बारीक लव असलेल्या एका मुलीने त्याला प्रपोज केलं. मनातलं सांगताना तिचा आतल्या आत होत असलेला थरकाप त्याला जाणवला होता. तो नाही म्हणाला तर पार उध्वस्त होईल, इतकी vulnerability दिसली होती. तिच्या याच शामळूपणामूळे, परनिर्भरतेमूळे त्याला तिला नाही म्हणायचं होतं. तो ते म्हणालाही. पण म्हणताना त्याची नजर सतत तिच्या चेहऱ्यावरून फिरत होती, एक-एक लव टिपत होती.

ती पहिले शरमली. मग निर्धाराने वर पाहिलं. डबडबलेल्या डोळ्यांनी. भिंगातून ते आणखीनच magnify झाले होते. ती मग उपहासाने हसली आणि म्हणाली, ‘मलाही ब्युटी पार्लर मध्ये जाता आलं असतं. पण मला वाटलं तुला बनाव आवडणार नाही.’
डोळ्यांत तोच निर्धार घेऊन ती निघून गेली. त्याला त्या दिवशी दुःखाला कारण मिळालं – तिच्या, त्याच्या आणि एकूणच दुःखाच्या. वेदनेचं रूपही स्थिर झालं – निर्धाराने डबडबलेले डोळे!

स्वतःची कीव करत त्याने कागदाला पेन लावला. सिगारेटही शिलगावली...


No comments:

Post a Comment